कहाणी स्वातंत्र्याची–बिळाशीच्या जंगल सत्याग्रहाची

जुना सातारा अन् आत्ताच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा पेठयातील बिळाशी हे शे-पाचशे उंबऱ्याचं गाव.. मावळतिकडनं गवळोबा आणि उगवतीकडून चिंचोबाच्या डोंगरांना गावाभोवती अर्धवट कड केलेलं.. दक्षिणेकडूण वाहणारीवारणामाई.. चैता सिमग्यापासून तिचं पात्र कोरडं ठणठणीत व्हायचं ! नदीत डबरा मारायचा आणि बेल्ट्याने पाणी भरायचं.. गावात सातवीपर्यंत शाळा.. इंग्रजांनी सगळीकडून गळा आवळलेला.. आपल्याच देशात आपण परदेशी झालेलो.. शाळेतनवीन आलेले दादासो आप्पाजी बर्डे गुरुजी मुलांना देशप्रेमाच्या गोष्टी सांगायचे. इंग्रजांच्या जुलमाबद्दल मुलांच्या मनात आग पेरायची .... दुपारच्या सुट्टीत सगळी लेकरं एकाच पंगतीत घेऊन जेवायचे.. तेव्हा जातीपाती खूप मानल्या जायच्या..पण गुरुजी सगळ्यात मिसळायचे...त्यांचा गावाला चांगलाच लळा लागला.. त्यांना साथ देणारे मारुती विष्णू कुलकर्णी उर्फ बाबुराव दादा चरणकर, रंगनाथ भिकाजी दांडेकर, गणपतराव पाटील, दत्तोबा लोहार, दत्तात्रय पोतदार, बापू मुलाणी, काँग्रेस गोविंद कृष्णा पाटील,भाऊ पवार,बाबाजी पाटील, ईश्वरा मगदूम,यशवंत सातपुते, धोंडी कुंभार यांच्यासह मुक्ताबाई साठे, मैनाबाई यमगर, धोंडूबाई मस्कर,राजूभाई मस्कर या भगिणी आघाडीवर होत्या.


१९२९ च्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्य हे ध्येय राष्ट्रीय काँग्रेसने ठरविले. त्याचवेळी सविनय कायदेभंगाचा ठराव पास झाला.

महात्मा गांधीजींच्या ११ मागण्यांकडे इंग्रजांनी दुर्लक्ष केले, त्याला प्रत्युत्तर म्हणून १४ फेब्रुवारी १९३० ला महात्मा गांधींनी कायदेभंगाचे आदेश दिले. समुद्रकिनारी मिठाचा सत्याग्रह, समुद्रकिनारा नाही तेथे जंगल सत्याग्रह करण्याचे आदेश दिले. आमच्या गावात आम्ही सरकार.. आमचा कारभार आम्ही करणार.. इंग्रजांचे सरकार मानायचं नाही असा हिय्या करून भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची चूड पेटली.


बिळाशी पंचक्रोशीतले लोक जमले; ते स्वातंत्र्याचा वणवा पेटवण्यासाठीच! तो दिवस होता 18 जुलै 1930.आषाढ शुद्ध सप्तमी सत्याग्रहासाठी शुभ मुहुर्त ठरला. सर्वजण कुसाईच्या नावानं चांगभल ऽ ऽ ऽ, हर हर महादेव ऽ ऽ ऽ, वन्दे मातरम् ऽऽऽ, भारत माता की जय ! अशा घोषणा देतकुसाईवाडीच्या अस्वल दऱ्यात गेले. घोषणांनी सारा आसमंत दणाणून गेला.


राजाराम सोनार भेडसगांवकर यांनी तयार केलेल्या चांदीच्या विळ्याने गवत कापून जंगल सत्याग्रहाला सुरवात झाली. लोकांच्या उत्साहाला उधाण आलेलं.. कुसाईवाडीच्या अस्वलदऱ्यातून कु-हाडीने ४० फूट उंचीचा सागाचा सोट तोडण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत बिळाशीच्या महादेव मंदिरात आणला गेला. समारंभपूर्वक ध्वजस्तंभ म्हणून याच ठिकाणी तो उभारण्यात आला. त्यावर तिरंगा डौलाने फडकू लागला. ध्वजाभोवती रांगोळ्या सडा सारवण केलं जायचं.. ब्रिटिशांच्या आमदानीत बिळाशीसारख्या छोट्या खेड्यात तिरंगा फडकवल्याच्या बातम्या हा हा म्हणता चहू मुलखात पसरल्या.


ध्वजाच्या रक्षणासाठी भागातील शेकडो स्त्री-पुरुष उत्साहाने येत. आया बहिणींच्या झिम्मा फुगड्या ध्वजा- भोवती रंगायच्या ! नागपंचमी (३० जुलै), गोकुळाष्टमी (१४ ऑगस्ट), गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट) हे सारे सण ध्वजाच्या साक्षीने साजरे झाले.


पण... इंग्रज धार्जिण्या पोलीस पाटलाने चुगली करून ही बातमी इंग्रजांना दिली.


शिराळ्याकडून पावलेवाडी खिंडीतून फौजदार बंकटसिंग ७०-८० पोलीसांचा फौजफाटा घेऊन दाखल झाला. पण पोलिसांना गावात कोणीच सहकार्य करेना. ना त्यांना अन्नपाणी, ना घोड्यांना चारा. भुकेल्या घोड्यानी अक्षरश: चाफ्याची पाने खाल्ली, बकटसिंगला गावकऱ्यांच्या एकीपुढे नमते घ्यावेच लागले. ८ ऑगस्ट १९३० ला तो आल्या पावली माघारी गेला. पंचक्रोशीतल्या तरुणाचा जथ्था भाकरी बाधून घेऊन ध्वजाच्या रक्षणासाठी सदोदीत दक्ष असे. मंदिरातला ढोल वाजला कि, हातातले काम टाकून लोक शिवारातून देवळावर येत. रात्री देवळातच नित्य नियमाने भजन किर्तन चाले.


५ सप्टेंबर १९३० हा सत्याग्रहाचा एकोणपन्नासावा दिवस. सहा-सातशे बंदुकधारी पोलीस गावात आले ते थेट देवळावरच. इशाऱ्याचा ढोल वाजला. गावकऱ्यांनी देऊळ गाठले. ध्वजाभोवती सहा कडी केली. प्राण गेला तरी बेहत्तर पण पोलिसांना मंदिराच्या आवारात येऊ दयायचे नाही असा चंग बांधला.


इंग्रज शिपायांनी लाठीमार सुरु केला, पोलीस आणि क्रांतीकारकांच्यात जोरदार झटापट झाली. पोलीसांनी दिसेल त्याला आडवे पडेपर्यंत मारायला सुरवात केली. लोकांचा नाईलाज झाला. अंगावर काठ्या फुटल्या. रक्तात न्हाले.


ध्वजस्तंभ इंग्रज शिपायांनी खाली पाडण्याचा प्रयत्न केला; तेंव्हा वीरांगनांनी ध्वजाला मिठी मारली ध्वज आपल्या ताब्यात घेतला. जणू तो आपल्या काळजातच लपवला. ध्वजस्तंभ इंग्रजांनी ताब्यात घेतला मात्र तिरंगा अखेरपर्यंत त्यांच्या हाती लागू दिला नाही. पुढे तोच ध्वज प्रचितगडावर फडकविण्यात आला.


तत्कालीन वृत्तपत्रातील बातम्यांनुसार पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेले ४२ जण अंथरुणाला खिळून होते. मांगरुळ, रिळे येथील अनेक महिला व पुरुष यामध्ये जखमी झाले. किमान एक हजार जणांना किरकोळ दुखापती झाल्या. अडीचशे हत्यारबंद पोलीस, पुण्यातील शंभर जवानांची किचनेर पलटण आणि वाटा रोखण्यासाठी कोल्हापूरातून पायदळातील दीडशे जवान तैनात करण्यात आले होते. इंग्रजांनी ध्वज उतरवला आणि ध्वजाच्या दांडीचे तुकडे करून गाडीत भरून ते शिराळयाला निघाले.


तिरंगा उतरवल्याचे कळताच मांगरुळच्या चिंचेश्वराच्या टेकडीवर धोंडी संतू कुंभार व शंकर भाऊ चांभार या मिसरुड न फुटलेल्या पोरांनी इंग्रजांवर त्वेषाने दगडफेक केली. इंग्रजांनी निर्दयपणे त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.देशासाठी धारातीर्थी पडलेल्या मुलांना फरपटत नेऊन लोहार दऱ्यात दफन केलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिलं बलिदान देणाऱ्या धोंडी संतू कुंभार आणि शंकर भाऊ चांभार यांना कसे विसरता येईल ? ही क्रांती जरी गांधीवादी होती तरी तिला भगतसिंगाच्या तेजाचा स्पर्श होता. उत्तर प्रदेशातील बलिया,प. बंगालमधील मिदनापूर आणि महाराष्ट्रातील सातारा पेठयातील बिळाशीचा उठाव आणि क्रांतीवीरांचं हौतात्म्य जगाच्या कायम स्मरणात राहिल.


शब्दांकन – श्री.बाबासाहेब परीट