प्रचितगड : हिंदवी स्वराज्याचा खजिना

शिराळा तालुक्याच्या पश्चिमेला असलेला शिवकालीन प्रचितगड हे एक ऐतिहासिक तसेच अतिशय दुर्गम ठिकाण. दुर्गमतेमुळे शिवाजी महाराजांनी प्रचितगडाची निवड हिंदवी स्वराज्याचा खजिना ठेवण्यासाठी केली. अनेक अपरिचित गडकोटामध्ये प्रचितगडाची गणना केली जाते. पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे हे ऐतिहासिक ठिकाण दुर्लक्षित राहिले आहे.


शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस व कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा जेथे एकत्र येतात, त्या सीमेवर शिवकाळाचा साक्षीदार प्रचितगड हा आपले उरले-सुरले अवशेष जपत उभा आहे. सांगली जिल्ह्याच्या अगदी एका टोकास असलेले हे ऐतिहासिक ठिकाण दुर्गमतेमुळे अद्याप अज्ञात आहे.


शिराळा येथून चांदोली धरणापर्यंत बसने जावे लागते. तेथून लौंचने अथवा चालत जावे लागते. जावळीपर्यंत चालत गेल्यावर तेथून कडेकपारी, डोंगर दऱ्या आणि घनदाट जंगलातून २५ ते ३० किलोमीटरचा पल्ला गाठावा लागतो. इतके अंतर कापल्यावर प्रचितगड नजरेस येतो. गडाच्या तिन्ही बाजू तासलेल्या कडयासारख्या उत्तर-दक्षिण अशा जणू नैसर्गिक भिंतीच आहेत. त्याची उत्तरेकडील बाजू सह्याद्रीच्या मुख्य रांगेला चिकटलेली आहे.


गडावर जाण्यासाठी तेथूनच एक अरुंद वाट आहे. तिच्या दोन्ही बाजूस खोल दऱ्या आहेत. ठिसूळ माती व वर्षभर वेगाने वाहणारा वारा यांना तोंड देत वर चढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. गडावर जाताना जाणवते कि, प्रचंड उंचीचे वृक्ष, त्यांना बिल्गुनच त्यांच्या उंचीशी स्पर्धा करणाऱ्या वेली, अस्ताव्यस्त पसरलेली झुडुपे यात जंगल लपेटून बसले आहे.


या जंगलातच जंगली श्वापदांचा मुक्त संचार आहे. यामध्ये बिबटे, अस्वले, कोल्हे, गवे , भेकर यांची भीती वाटते. दिवसासुद्धा सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही. जंगलातून जाताना पायास जळू चिकटण्याची शक्यता जास्त. जळू पायास चिकटलेली माहितही होत नाही. रक्त शोषून फुगलेली जळू ओढली तरी निघत नाही. तिला सोडवण्यासाठी तंबाखूचे पाणी अथवा ओली तंबाखू टाकावी लागते. येथील जावळी , रुंदीव हि खेडी सह्याद्रीच्या पूर्ण उतारावर मुख्य रांगेच्या कुशीत होती. ती चांदोली धरणामुळे स्थलांतरित झाली आहेत. अभयारण्यामध्ये तीन वाघ -२ नर १ मादी ,९ बिबटे ,१४५ सांबर आहेत. गवे २६५, अस्वले ७५ , कोल्हे ४५, ससे ६५, रानडुक्कर २५५, भेकर १४५ आणि १० खवले मांजर आहेत.


रुंदिव मार्गे प्रचीतागडाला जाणे म्हणजे फार धाडसाचे काम आहे . जंगली प्राण्यांची भीती सतत मनावर दडपण आणते. वारणेच्या डाव्या बाजूने पश्चिमेस पर्वतरांग चढून गेल्यास आपण सह्याद्रीच्या माथ्यावर येतो. तेथे जंगलाचा मागमूसही राहत नाही. डोंगरमाथ्यावर पाहावे तिकडे बॉक्साईटच्या थराचा मैलोन्मैल सडाच पडलेला आहे.


या ठिकाणची उंची ३२०० फुट असल्यामुळे हवा थंड आहे. या कड्यावरून सहा किलोमीटर अंतर ओलांडताच अचानक प्रचीत्गादाचे दर्शन होते. गडाची उंची सह्याद्रीच्या मुख्य रांगेपेक्षा कमी आहे, परंतु त्याच्या दुर्गमतेमुळे गडावर जाणे हे पर्यटकांसमोर एक आव्हानच आहे. सह्याद्रीच्या माथ्यापासून दोनशे फुटाचा कडा उतरल्यावर आपण एकदम गडाच्या उध्वस्त बुरुजांच्या पायथ्याला येतो. १९६८ ला झालेल्या भूकंपामुळे गडावर जाणाऱ्या बऱ्याच पायऱ्या पूर्णपणे तुटल्या आहेत. त्यामुळेच हि चढण अतिशय अवघड आहे. काही ठिकाणी कडे कपारीतील खोबणीत हात घालून अगदी इंच-इंचाने वर चढावे लागते. एखाद्या बेसावध क्षणी हात सुटला , तर अडीच हजार फुट खोल दरीत कोसळून कपाळमोक्ष होणार हे तर ठरलेलेच!